शिरूर दिनांक ( वार्ताहर ) महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने सन-२०२३ मध्ये घेण्यात आलेल्या राज्य विक्रीकर निरीक्षक परीक्षेत सरदवाडी (ता.शिरूर) येथील शेतकरी कुटुंबातील स्वप्नील सोपान सरोदे याची राज्य विक्रीकर निरीक्षक म्हणून निवड झाली आहे. शेतकरी कुटुंबातील स्वप्नीलचे वडील रांजणगाव औद्योगिक वसाहत परिसरातील कंपनीमध्ये काम करतात तर आई गृहिणी असून शेतात काम करते.अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वप्नीलने यश संपादन केले आहे.त्यामुळे स्वप्नील बरोबरच त्याच्या आई-वडिलांचेही परिसरातून कौतुक होत आहे. स्वप्नीलचे शालेय व माध्यमिक शिक्षण शिरूर येथील विद्याधाम प्रशाला येथे झाले.तसेच,स्वप्नीलने महाविद्यालयीन शिक्षण परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून बी.टेक (कृषी अभियांत्रिकी)पदवी घेऊन पूर्ण केले.त्यानंतर स्वप्नील पुणे येथे सुमारे ४ वर्षे मेहनतीने राज्यसेवा परीक्षेची तयारी करत होता. राज्यसेवा परीक्षेची तयारी करत असताना स्वप्नीलने अनेक वेळा वेगवेगळ्या विभागांच्या परीक्षा दिल्या त्यामध्येही त्याला यश आले.नुकत्याच झालेल्या राज्यसेवा परीक्षेत स्वप्नीलला यशाने थोडक्यात हुलकावणी दिली परंतु,स्वप्नीलने दोन दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या राज्य विक्रीकर निरीक्षक परीक्षेत यश संपादन करून,राज्यात ५३ वा क्रमांक मिळवला.तसेच पुणे तलाठी भरतीमध्येही स्वप्नीलने यश मिळवले असून,२३ व्या क्रमांकाने तलाठी परीक्षेत उत्तीर्ण झाला आहे.