शिरुर - व्हर्लफुल कंपनीचे फ्रीज चोरी प्रकरणी आरोपीस अटक करुन 1 लाख ४७ हजार रु. किंमतीचे 10 फ्रिज पोलीसांनी जप्त केले आहेत . यासंदर्भात पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार याबाबत दिपक ज्योतीबा खैरे रा. वडगावशेरी, पुणे यांनी फिर्याद दिली आहे. रांजणगाव एमआयडीसी मधील व्हर्लफुल कंपनीमधुन कंटेनर क्र. एन एल - 01 एन 7934 यामधुन 91 फ्रिज हे रांजणगाव ते मल्लपुरम, केरळ येथे कंटेनर चालक बाळु राजेद्र थोरे हा घेवुन जात असतांना त्याने त्यापैकी 1,61,749/रु. किंमतीचे 11 फ्रिज हे कंटेनरचे सिल तोडुन कोठेतरी विक्री करुन फरार झाला होता. याबाबत दिपक ज्योतीबा खैरे रा. वडगावशेरी, पुणे यांचे फिर्यादीवरुन रांजणगाव पोलीस स्टेशन येथे कंटेनर चालकाचे विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता . गुन्हा दाखल होताच घटनेचे गांभीर्य ओळखत पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी तपास पथकास आरोपीचा व चोरीस गेलेले फ्रिजचा शोध घेणेबाबत सुचना दिल्या होत्या. त्यानुसार तपास पथकातील पोलीस हवालदार वैजनाथ नागरगोजे, तेजस रासकर व विजय शिंदे यांनी गुप्त बातमीदारामार्फत तसेच तांत्रिक तपासाचे मदतीने आरोपीचा व चोरीस गेले मालाचा शोध घेत असतांना कंटेनर चालक बाळु राजेंद्र थोरे वय 28 वर्षे, रा. तिंतरवाणी, ता. शिरुर कासार, जि.बीड यास ताब्यात घेवुन अटक केली आहे. पोलीस कस्टडी दरम्यान आरोपीकडे तपास केला असता थोरे याने सदरचे फ्रिज हे कौफ, ता. जि. उडपी, राज्य कर्नाटक येथील एक हॉटेलमध्ये विक्री करण्यासाठी ठेवले असलेले मिळुन आले. आरोपकडुन गुन्ह्यात चोरीस गेलेले 1,47,040/रु. किंमतीचे एकुण 10 फ्रिज जप्त करण्यात आलेले असुन उर्वरीत एका फ्रिजबाबत तपास सुरु आहे. ही कामगिरी पोलीस अधिक्षक पकंज देशमुख अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे , उपविभागीय पो. अधिकारी प्रशांत ढोले यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, पो. हवालदार वैजनाथ नागरगोजे, तेजस रासकर व विजय शिंदे, पो.ना. माणिक काळकुटे यांनी केला आहे. यासंदर्भातील अधिक तपास पोलीस हवालदार तेजस रासकर, हे करत आहेत.