[ चिपळूण ]
चिपळूणमधील पोलिस कर्मचाऱ्याने आपल्याच खात्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप करणारा व्हिडिओ तयार केल्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षकांनी त्याची गंभीर दखल घेतली आहे. संबंधित पोलिस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या अवैध कामास नकार दिल्यानेच मुख्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या अधिकाऱ्यांसह एका कनिष्ठ अधिकारी आणि ३ पोलिस कर्मचाऱ्यांनी सांगितल्यामुळे माझ्यावर अन्याय झाला असा गंभीर आरोप करणारा व्हिडीओ चिपळूणातील पोलिस कर्मचारी इम्रान शेख यांनी तयार केला आहे. शेख यांनी हा व्हिडिओ आपल्या मोबाईलवर स्टेटस ठेवल्यानंतर पोलिस प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. १५ दिवसात न्याय न मिळाल्यास अधिकाऱ्यांसह सामाजिक, राजकीय आणि अवैध धंदेवाले यांची नावे जाहीर करण्याची धमकीही त्याने दिली आहे. खात्यातील काही प्रमुख अधिकाऱ्यांकडून झालेला अन्याय या व्हिडीओद्वारे मांडल्याचे त्याचे म्हणणे आहे.
या व्हिडिओनुसार ६ महिन्यांपूर्वी त्यांची बाणकोट येथून अलोरे येथे बदली करण्यात आली. सहा महिन्यापूर्वीच नाटे येथे बदली करण्यात आली. त्यानंतर त्याना जिल्हा पोलिस मुख्यालयात हजर राहण्याची सूचना करण्यात आली. याचे कारण चिपळूणमधील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने माझ्याबद्दल खोटा रिपोर्ट जिल्हा पोलिस अधीक्षक यांना दिला आहे. चिपळूणमधील काही सामाजिक, राजकीय कार्यकर्ते आणि वरिष्ठ पोलिस अधिकारी व काही कर्मचाऱ्यांचा ग्रुप आहे. त्यांनी माझ्याविरोधात षड्यंत्र रचले आहे. चुकीच्या पद्धतीने कारवाई करण्यात आली आहे. यासंदर्भात पोलिस अधिक्षकांनी पंधरा दिवसांत न्याय देण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र अजून काहीच कारवाई झालेली नाही. पंधरा दिवसात न्याय न मिळाल्यास संबंधीत पोलिस अधिकारी, कर्मचारी व सामाजिक, राजकीय नेते यांचे नाव जाहीर करणार असल्याचा इशारा शेख यांनी दिला आहे.
दरम्यान इम्रान शेख यांच्या व्हिडिओनंतर वरिष्ठ अधिकान्यांकडून अहवाल मागवण्यात आला. त्यानुसार मी माझा अहवाल वरिष्ठांना दिला आहे. संदर्भात जिल्हा पोलिसप्रमुख योग्य तो निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया चिपळूणचे उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने यांनी दिली.