( रत्नागिरी )
केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास मंत्रालयाने 'प्रधानमंत्री मातृवंदना' योजनेत सद्यस्थित रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षात ५५३३ नोंदणी उद्दिष्ट होते. त्यापैकी एकूण १ हजार २७१ लाभार्थी मातांची नोंदणी झाली आहे. आतापर्यंत पहिले आणि दुसरे अपत्य असलेल्या १४७ लाभार्थीच्या खात्यावर ७ लाख ८९ हजार रुपये अनुदान रक्कम जमा करण्यात आली आहे.
प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेची अंमलबजावणी राज्यात ८ डिसेंबर २०१७ पासून आरोग्य विभागामार्फत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्य / जिल्हास्तरावरुन सुरू होती. शासनाने अधिसूचित केलेल्या संस्थेत नोंदणी केलेल्या मध्ये गर्भवती महिलेस पहिल्या जीवित अपत्यापुरता एकदाच लाभ अनुज्ञेय असून, तीन टप्प्यात लाभाची रक्कम ५ हजार रुपये अपद्वारे लाभार्थीच्या बँक, पोस्ट खात्यात दिली जात होती. आता यामध्ये सुधारित प्रधानमंत्री मातृवंदना योजना २.० राज्यात लागू करण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास मंत्रालय सूचनांनुसार योजनेतंर्गत लाभार्थीना लाभ देणे व योजना राबविण्याबाबतच्या सुधारित मार्गदर्शक सूचना सन २०२३-२४ पासून राज्यात लागू करण्यात आल्या आहेत. ही योजना केंद्र व राज्याच्या सहभागाने राबविण्यात येत आहे. लाभार्थ्यांकरिता केंद्र शासनाचा ६० टक्के तर राज्य शासनाचा ४० टक्के सहभाग आहे. योजनेचा संपूर्ण प्रशासकीय खर्च शासनाच्या स्व-निधीतून भागविण्यात येत आहे.
मातृवंदना योजनेसाठी एकूण ५ हजार ५३३ महिलांचे उद्दीष्टापैकी पहिल्या अपत्य लाभार्थीची ८६८ नोंदणी झाली. त्यातील ९३ लाभार्थीच्या खात्यावर ४ लाख ६५ हजार रु. इतकी अनुदान रककम जमा झाली आहे. दुसऱ्या अपत्य लाभार्थीची ४०३ इतकी नोंदणी झाली असून, त्यातील ५४ लाभार्थीच्या खात्यावर ३ लाख २४ हजार रु. इतके अनुदान जमा झाले आहे.
योजनेचा लाभ किती मिळतो?
'प्रधानमंत्री मातृ वंदना' योजनेतंर्गत पात्र लाभार्थी महिलेने विहीत अटी, शर्ती आणि कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर तिला पहिल्या अपत्यासाठी ५ हजार रुपयांची रक्कम दोन हप्त्यांमध्ये, तर दुसरे अपत्य मुलगी झाल्यास मुलीच्या जन्मानंतर एकाच टप्प्यात ६ हजार रुपयांचा लाभ आधार संलग्न बँक खात्यात किंवा टपाल विभागातील खात्यात डीबीटी द्वारे जमा केला जातो.
प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची उद्दिष्टे
माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने गर्भवती महिला व स्तनदा मातांना सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करुन त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी. नवजात बालकांचे आरोग्य सुधारावे आणि माता मृत्यू व बाल मृत्यू दरात घट होऊन तो नियंत्रणात रहावा. स्त्री भ्रूण हत्येस अवरोध करणे आणि स्त्री जन्माचे स्वागत होण्यासाठी हितकारी ठरणार आहे.