सर्वांना सोबत घेऊन पक्षसंघटना वाढीसाठी काम करणार- नूतन जिल्हाध्यक्ष सुरेश बने
[ संगमेश्वर ]
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी देवरूखच्या सुरेश उर्फ बारक्याशेठ बने यांची सोमवारी (दि.८ जानेवारी २०२४) नियुक्ती करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेश सरचिटणीस व रत्नागिरी जिल्हा निरीक्षक बबनराव कनावजे यांच्याहस्ते साडवली सह्याद्रीनगर येथील गौरीविहार संकुल येथे सुरेश बने यांना निवडीचे नियुक्तीपत्र सुपूर्द करण्यात आले. सुरेश बने हे राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीसही आहेत. नियुक्तीपत्र देण्यात आल्यानंतर पार पडलेल्या सत्कार समारंभ कार्यक्रमात पक्षाचे जिल्हा निरीक्षक बबनराव कनावजे यांच्याहस्ते सुरेश बने यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना बबनराव कनावजे म्हणाले कि, पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुदेश मयेकर यांनी प्रकृतीच्या कारणास्तव पदाचा राजीनामा दिल्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सूचनेनुसार जिल्हाध्यक्ष निवडीसाठी आपण जिल्ह्यातील पक्षाच्या जेष्ठ कार्यकर्त्यांशी चर्चा केली असता सुरेश बने यांचे नाव पुढे आले.
यानंतर वरिष्ठांशी चर्चा करून जिल्हाध्यक्ष पदासाठी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. सुरेश बने हे गेली काही वर्षे पक्षासाठी एकनिष्ठ राहून काम करीत आहेत. पक्षासाठी आपण दिलेल्या योगदानाची पक्षाने दखल घेऊन आपली जिल्हाध्यक्ष म्हणून निवड केली आहे. यापुढे आपण पक्षवाढीसाठी काम करून राष्ट्रवादी पक्षाचे विचार घराघरात पोहचवावेत, असे सांगितले. तर नूतन जिल्हाध्यक्ष सुरेश बने यांनी म्हटले कि, पक्षाने आपल्यावर दिलेली जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी आपण प्रामाणिकपणे पार पाडणार असून सर्वांना सोबत घेऊन आपण पक्षसंघटना वाढीसाठी काम करणार असल्याचे सांगितले. यावेळी राष्ट्रवादीचे संंगमेश्वर तालुकाध्यक्ष बाबा साळवी, जिल्हा उपाध्यक्ष मोहन वनकर, देवरूख व्यापारी संघटनेचे अध्यक्ष बाबा सावंत, शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख बंड्या बोरूकर, राष्ट्रवादीच्या महिला तालुकाध्यक्षा दिपाली किर्वे यांनी आपल्या मनोगतातून नूतन जिल्हाध्यक्ष सुरेश बने यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी राष्ट्रवादीचे देवरूख शहराध्यक्ष निलेश भुवड, बाबा जाधव, अप्पा सावंत, मुन्ना थरवळ, अल्ताफ जेठी, मोरेश्वर चव्हाण, संतोष जाधव, संदीप धावडे, संदेश घाग आदिंसह पदाधिकारी, कार्यकर्ते व सुरेश बने समर्थक बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन कनावजे यांनी केले.