नारळ विक्री, टपरीच्या आडून गांजाची विक्री

'एनडीपीएस'ची कारवाई : ५ किलो गांजा जप्त

औरंगाबाद प्रतिनिधी -औरंगाबाद शहरातील डॉ. हेडगेवार रुग्णालयासमोर नारळविक्री आणि टपरीच्या आडून गांजाची तस्करी होत असल्याची माहिती एनडीपीएसच्या पथकाला मिळाली होती. माहितीवरून एनडीपीएसच्या पथकाने छापा मारून एका टपरीतून तब्बल ५ किलो गांजा जप्त केला. गांजा तस्कराने येथील दोन टपऱ्या चालवण्यासाठी घेतल्या होत्या. तेथे ४०० रुपये रोजाने तरुणाला ठेवून, तो गांजाची विक्री करत असल्याचे तपासात समोर आले आहे. 'ऐकावे ते नवल', असे म्हटले तर वावगे ठरू नये, असा हा प्रकार बुधवारी समोर आला आहे.

सचिन राजू ठोंबरे, सुरेश भगवान उंबरकर (दोघे रा. पोलिस मित्र कॉलनी, हेगडेवार हॉस्पिटलच्या मागे) आणि विनय संतोष सरोदे (रा. शिवशंकर कॉलनी) अशी आरोपींची नावे आहेत. सचिन ठोंबरे हा मुख्य तस्कर असून, सुरेश उंबरकर आणि विनय सरोदे हे त्याच्याकडे रोजाने काम करत होते. ठोंबरेविरुद्ध जवाहरनगर, उस्मानपुरा, क्रांती चौक पोलिस ठाण्यांत गांजा विक्रीचे गुन्हे दाखल आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एनडीपीएस पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक हरेश्वर घुगे, सहायक उपनिरीक्षक नसीम खान, पोलिस अंमलदार महेश उगले, विशाल सोनवणे, सुरेश भिसे, चालक दत्ता दुभळकर, महिला शिपाई प्राजक्ता वाघमारे हे शहरात गस्त घालत असताना डॉ. हेडगेवार रुग्णालयासमोरील टपरीवरून गांजाची विक्री केली जात असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यांनी पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांना माहिती देऊन कारवाईसाठी सापळा रचला. त्यात हातगाडीवरून नारळ विक्री करणारा एक तरुण गांजाच्या पुड्या खिशात ठेवून थेट विक्री करत असल्याचे त्यांना दिसून आले. तसेच टपरीतील. एक जण १०० रुपयांना चिलीम बनवून देत असल्याचे स्पष्ट झाले. खात्री पटताच पोलिसांनी उंबरकर आणि सरोदे या दोघांना पकडले. त्यांच्या चौकशीत सचिन ठोंबरे याचे नाव समोर आले. पथकाने लगेचच त्यालाही अटक केली. त्याच्या टपरीतून ५ किलो ११ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. या तिघांविरुद्ध जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक वाघ करत आहेत.