बीड प्रतिनिधी - दोन वेगवेगळ्या पक्षात असतानाही पक्के मित्र म्हणून ओळखले जाणारे आठवणीतील विलासराव देशमुख आणि दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची या महाराष्ट्राला आणि देशाला ओळख नवीन 

दोन भिन्न पक्षात असूनही पक्के मित्र म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या मराठवाड्यातील दोन नेत्यांच्या स्मृती जागवण्यासाठी मात्र सापत्नभाव घडत आहे. लोहा तालुक्यातील माळाकोळी येथे उभारण्यात आलेल्या गोपीनाथ मुंडे स्मृती-भवनाच्या कामाकडे दुर्लक्ष करणाऱ्या भाजपच्या नांदेड आणि लातूर मतदारसंघांच्या खासदारद्वयांनी माळाकोळीजवळच्या माळेगाव यात्रा परिसरात काँग्रेसचे दिवंगत नेते, राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा पुतळा उभारण्याच्या कामात लक्ष घातले आहे. माळेगाव येथे खंडोबा देवस्थान असून दरवर्षी या ठिकाणी दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा भरविली जाते. देशमुख परिवाराचे श्रद्धास्थान म्हणूनही या गावाची ओळख आहे. येथील यात्रा नव्या वर्षाच्या दुसर्या आठवड्यात भरणार असून यात्रेच्या पूर्वतयारीसाठी स्थानिक आमदार श्यामसुंदर शिंदे आणि प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गेल्या

आठवड्यात एक बैठक झाल्यानंतर प्रताप पाटील चिखलीकर आणि सुधाकर श्रृंगारे य खासदारद्वयानी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना पाचारण करून शुक्रवारी स्वतंत्र बैठक घेतली.

वरील बैठकीचे वृत्त शासनाच्या प्रसिद्धी खात्याच्या यंत्रणेकडून जारी झाले नाही.

खासदर चिखलीकर यांच्या संपर्क कार्यालयातून या बैठकीची माहिती देणारे एक वृत्त जारी करण्यात आले. त्यात नंतर सुधारणा करण्यात आली. या सुधारित वृत्ताद्वारे विलासरावांचा पुतळा उभारण्याची माहिती वृत्तपत्रांना देण्यात आली. माळेगाव यात्रा परिसराचा विकास करण्यासाठी

विलासरावांनी दिलेल्या योगदानाची माहितीही देण्यात आली. विलासरावांची स्मृती जपण्यासाठी यात्रा परिसरात त्यांचा पुतळा उभारण्याचा संकल्प जाहीर करतानाच खासदार चिखलीकर यांनी नांदेड जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका करण्याची संधी साधली. त्याचवेळी विलासरावांच्या पुतळ्याची घोषणा करणार्या भाजपच्या दोन विद्यमान खासदारांनी नाळाकोळी येथील गोपीनाथ मुंडे स्मृती-भवनाच्या कामासाठी आतापर्यंत कुठल्याही प्रकारची मदत केली नसल्याची माहितीही समोर आली. विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांची पक्षीय राजकारणापलीकडची मैत्री महाराष्ट्रात सुपरिचित होती. राज्यातून केंद्रीय राजकारणात गेलेले हे दोन नेते गेल्या दशकात पावणेदोन वर्षांच्या अंतराने काळाच्या पडद्याआड गेले.