हिंगणघाट : वैराग्यमूर्ती श्री संत गाडगेबाबा पुण्यतिथी महोत्सवानिमित्त गुरुवारी (ता. 28) वणा नदीचे सहस्त्र लिंगाचे तीरावर यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. यानिमित्ताने पंचक्रोशीतील हजारो अनुयायी गाडगे बाबांच्या समाधीचे दर्शन घेणार आहे. यंदा यात्रा महोत्सवाचे ६७ वे वर्ष आहे.  बुधवारी(ता.20 ) पुण्यतिथी महोत्सवाची सुरुवात झाली. पुण्यतिथी निमित्य विविध कार्यक्रमाचे आयोजन वणा नदीचे सहस्त्र लिंगाचे तीरावर २८ डिसेंबर पर्यंत करण्यात आलेले आहे. २८ डिसेंबर हा यात्रा महोत्सवाचा समारोपीय दिवस आहे. या दिवशी हजारो अनुयायी श्री संत गाडगेबाबांच्या नाम समाधीचे दर्शन घेऊन नतमस्तक होतात. यानिमित्ताने संत गाडगे बाबा नाम समाधी स्थळावर गोपाल काल्याचे किर्तन होणार आहे तसेच नदीपरिसरात दुपारी दोन वाजता राष्ट्रीय कीर्तनकार व सप्तखंजेरी वादक कु.क्रांती मंगेश काळे यांचा समाज प्रबोधनात्मक सप्त खंजिरी कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमात रांगोळी आणि चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे गाडगे बाबांच्या अनुयायांसाठी महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. गुरुवारी ता.२८  यात्रेनिमित्त आनंद मेळा तसेच विविध खाद्यपदार्थांचे दुकाने थाटण्यात येणार आहे. पंचक्रोशीत ही यात्रा प्रसिद्ध आहे. गाडगेबाबांनी दिलेला स्वच्छतेतून समृद्धीकडे हा मंत्र घराघरात रुजवण्यासाठी मंडळाच्या वतीने अभियान राबविण्यात येत आहे. गुरुवारी ता. २९ मंडळाच्या वतीने वणा नदीपरिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन श्री संत गाडगेबाबा कल्याणकारी मंडळ व यात्रा कमिटीने केलेले आहे.