अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जणं जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी
"पाचोड-पैठण रस्त्यावरील दावरवाडी शिवारातील घटना"
पाचोड( विजय चिडे) पैठणहून आपल्या दुचाकीने घरी येणाऱ्या मुलाला व आईला समोरून भरधाव वेगात येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने यात दुचाकीस्वार जागीच ठार तर आई गंभीर जखमी झाल्याची घटना पाचोड - पैठण रस्त्यावर दावरवाडी (ता. पैठण) शिवारात सोमवारी (दि. १८) रात्री साडे सात वाजेच्या सुमारास घडली असून या अपघातात समाधान सिताराम दांडगे( वय२३) रा.कडेठाण हा जागीच ठार झाला तर सुशीलाबाई सिताराम दांडगे (वय ६०) या गंभीर जखमी झाल्या आहेत.
यासंबंधी अधिक माहिती अशी, समाधान सिताराम दांडगे( वय २३)त्यांची आई सुशीलाबाई सिताराम दांडगे रा.कडेठाण(ता.पैठण) हे माय-लेक सोमवारी सकाळी कडेठाण येथून आपले शेतीचे पीएम किमान योजनेची पैसे येत नसल्याने पैठण येथील तहसील कार्यालयात चौकशीसाठी गेले होते तेथील काम आटोपून सायंकाळी हे दोघे जण (क्रमांक -एमएच २० एम ४२११) ने आपल्या गावी कडेठाण येथे जात होते. ते दोघे पाचोड -पैठण दावरवाडी शिवारात येताच समोरून भरधाव वेगात येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. यांत समाधान दांडगे याला गंभीर मार लागून तो जागीच ठार झाला तर त्याची आई सुशीलाबाई दांडगे या गंभीर जखमी झाल्या आहे.सदर वाहन चालकाने अंधाराचा फायदा घेऊन कोणतीही कल्पना न देता , मदत न करता घटनास्थळाहून पळून जाण्यात धन्यता मानली. रस्त्याने जाणाऱ्या वाटसरूनी हा अपघात पाहून पाचोड पोलिसांना माहीती दिली. माहीती मिळताच पाचोडचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष माने, पोलीस नाईक पवन चव्हाण, योगेश केदार यांनी तात्काळ घटनास्थळी पोहचले व त्यांनी स्वतः घटनास्थळी पडलेला मृतदेह व जखमी महिलेस रुग्णवाहिका वाहनाद्वारे तातडीने पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. उपस्थित वैद्यकीय अधिकारी डॉ. विक्रम ठाकरे यांनी समाधान दांडगे यास तपासून मृत घोषित केले तर जखमी सुशीलाबाई दांडगे यांच्यावर प्राथमिक उपचार केले आहे. याप्रकरणी पाचोड ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास जमादार अण्णासाहेब गव्हाणे, पोलीस नाईक पवन चव्हाण हे करीत आहे .