शिरुर :   शिकण्यासाठी विशिष्ट वयांची गरज नसते शिकण्याची व नवीन जाणून घेण्याची उर्मी मनात हवी. आयुष्यभर व्यक्ती काहीना काही शिकत असते असे सामाजिक व साहित्यप्रेमी कार्यकर्त्या रंजनाताई शर्मा शिरूर येथे बोलताना म्हणाल्या. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा शिरूर यांच्या वतीने मागील दोन दशकाहून अधिक काळ बेलवंडी , ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर येथे पदरमोड करीत ग्रामीण साहित्य समेंलन आयोजीत करणा-या रंजनाताई पोपटलाल शर्मा व त्याच्या मुलगा अशोक पोपटलाल शर्मा यांचा साहित्यसेवा गौरव पुरस्कार देवून सन्मान चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालय शिरूर येथे करण्यात आला. प्राचार्य डॉ. के.सी.मोहिते व साहित्य परिषद शाखा शिरूरचे अध्यक्ष नीलेश खाबिया यांच्या हस्ते रंजनाताई शर्मा व अशोक शर्मा यांना सन्मानचिन्ह, शाल श्रीफळ,देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य शिरीष बरमेचा, प्रा.डी.के. मांडलिक, साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्षा डॉ. क्रांती पैठणकर (गोसावी), उपाध्यक्ष प्रा.सतीश धुमाळ , प्रवीण गायकवाड ,प्रा.डॉ. पल्लवी ताठे, प्रा. आकांक्षा वळे, प्रा. रुपाली व्यवहारे, नंदकुमार पिंजरकर आदी उपस्थित होते. यावेळी सन्मानाला उत्त्तर देताना रंजनाताई शर्मा म्हणाल्या की साहित्याविषयी असणा-या आवडीमुळे मागील २० वर्षाहून अधिक काळ ग्रामीण भागात साहित्य समेंलन मुलगा अशोक याचा समवेत घेत असून याकाळात अनेक दिग्गज साहित्यिक व कलाकार यांनी या साहित्य संमेलनास हजेरी लावली . यापुढील काळात ही साहित्याची सेवा संमेलनाच्या माध्यमातून करणार असून या कामी विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन केले. कवी अशोक शर्मा म्हणाले की आपणांस साहित्याची आवड असून या आवडीतूनच आपल्या ही गावात साहित्य संमेलन झाले पाहिजे असा संकल्प करून मागील २० वर्ष साहित्य समेंलनाचे आयोजन करत आहे. काव्य लेखन व पत्रलेखन करण्याची आपली आवड असून देशभरातील मान्यवरांना आपण पत्रलेखन केले असून या मान्यवरांची पत्रे ही आपणास आली असल्याचे सांगून काही कवितांचे सादरीकरण त्यांनी केले. यावेळी प्रास्ताविक साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्षा डॉ. क्रांती पैठणकर यांनी केले. त्यात त्यांनी शर्मा मायलेकराचा जीवनकार्य पट विशद करत अशोक शर्मा यांनी केलेल्या पत्रव्यवहार व त्या पत्रांना मान्यवरांनी पत्रातून दिलेली उत्तरे त्याचे जतन व संवर्धन करून देण्याचे जाहीर केले. साहित्य परिषद शिरूरचे अध्यक्ष नीलेश खाबिया यांनी शर्मा मायलेकरांनी केलेली साहित्याची सेवा ही कौतुकास्पद असल्याचे सांगून शर्मा यांचा पत्रव्यवहार जतन व संवर्धन करण्याकामी व त्यांना मिळालेले मान सन्मानचिन्ह ठेवण्यासाठी माजी उपनगराध्यक्ष कै. मोहनलाल खाबिया यांच्या स्मरणार्थ लोखंडी कपाट देणार असल्याचे जाहीर केले. प्राचार्य डॉ. के.सी.मोहिते, शिरीष बरमेचा यांनीही शर्मा यांच्या कार्याचा गौरव करीत शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. सतीश धुमाळ यांनी केले. फोटो ओळी ग्रामीण भागात साहित्य समेंलनाचे आयोजन करणारे बेलवंडी येथील रंजनाताई शर्मा व अशोक शर्मा या मायलेकराचा ‘साहित्यसेवा गौरव पुरस्कार ‘ देवून महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा शिरूर यांच्या वतीने सन्मान करण्यात आला.