शिरूर दिनांक ( वार्ताहर) माजी  उपनगराध्यक्ष ,ज्येष्ठ पत्रकार दिवंगत मोहनशेठ खाबिया यांचे शिरूर शहराच्या जडणघडणीत मोलाचे योगदान असल्याचे प्रतिपादन माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत बोरा यांनी केले.

खाबिया यांच्या २५ व्या स्मृतिदिनानिमित्त शहरातून जाणाऱ्या पुणे नगर रस्त्यावर पी डी सी सी बँकेकडे जाणाऱ्या चौकाचे  'स्व.मोहनशेठ खाबिया चौक' असे नामकरण करण्यात आले.या फलकाचे पोलिस निरीक्षक संजय जगताप यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.यावेळी बोरा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.ते म्हणाले,शहरातील अनेक महत्वाच्या विकासकामांना खाबिया  यांनी मूर्त स्वरूप दिले.त्यांनी त्यांच्या जीवनात समाजाभिमुख राजकारण करून सर्वसामान्यांना न्याय देण्याचा नेहमी प्रयत्न केला. शिरूरच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहीली जाईल अशी हुडको ची ३७१ घरांची योजनाही खाबिया  यांच्या उपनगराध्यक्ष पदाच्या कारकीर्दीत पूर्णत्वास आली. खाबिया  यांचे कार्य कायम स्मरणात राहील असे ते म्हणाले.

     माझे वडील मोहनशेठ यांच्या कार्याची दखल घेऊन नगरपरिषदेने त्यांच्या निधनानंतर दि ५/७/२००० ला त्यांचे चौकाला नाव देण्याचा ठराव केला.ठराव केल्यानंतर उशिरा का होईना २४ वर्षांनी या ठरावाची अंमलबजावणी करण्यात आली.आज त्यांच्या २५ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांच्या नावाचे फलकाचे अनावरण होताना आमच्या कुटुंबीयांना विशेष आनंद होत आहे.अशा भावना खाबिया  यांचे चिरंजीव शिरूर नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी सभापती निलेश खाबिया यांनी व्यक्त केल्या.

   वैभव खाबिया,राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अविनाश मल्लाव, मराठा महासंघाचे अध्यक्ष शामकांत वर्पे, जैन युवा परिषदेचे प्रकाश बाफना, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र कालेवार,उद्योजक नितीन मुथा, नगरपरिषद पाणी पुरवठा विभागप्रमुख भगवान दळवी, विजय ढमढेरे,निलेश नवले,आदी  उपस्थित होते. पत्रकार प्रविण गायकवाड यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर मीत खाबिया यांनी आभार मानले.