सोलापूर - पावसाळ्यामुळे शहरातील प्रत्येक रस्त्यावर खड्डे पडले आहेत. यापैकी ३ हजार मोठे खड्डे बुजविण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. यासाठी दीड कोटींचा खर्च येईल, असे मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी सोमवारी सांगितले. पावसाळा संपल्यानंतरच मुख्य १७ रस्त्यांवर डांबरीकरण होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

गेली दीड महिना शहरात सतत पाऊस पडतोय. पावसाळा सुरू होण्यापूर्वी रस्ते खराब झाले होते. संततधारेमुळे सर्वच रस्त्यांवर खड्डे वाढले आहेत. श्रावण महिन्यात शहरात विविध समाजबांधवांच्या वतीने रथोत्सवाचे आयोजन केले जाते. या रथोत्सव समित्यांच्या वतीने रस्ते दुरुस्तीची मागणी होत आहे. पालिकेने गेल्या १५ दिवसांत रस्त्यांचे सर्वेक्षण केले. मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवर पालिकेच्या निधीतून खड्डे दुरुस्तीचे काम होईल. प्रमुख १७ रस्त्यांच्या डांबरीकरणाची वर्क ऑर्डर देणार आहोत. पाऊस कमी झाला की या रस्त्यांवर डांबराचा पहिला थर टाकण्यात येईल. पावसाळ्यानंतर शेवटचा थर टाकण्यात येईल, असे आयुक्तांनी सांगितले.