शिक्रापुरातील हॉस्पिटलच्या समोरील पार्किंग मधून स्कॉर्पिओची चोरी

तळेगाव ढमढेरे, प्रतिनिधी:

 शिक्रापूर (ता. शिरुर) सह परिसरात वारंवार दुचाकी वाहनांची चोरी होत असताना आता चक्क एका हॉस्पिटल समोरील पार्किंग मध्ये लावून ठेवलेली स्कॉर्पिओ कार चोरीला गेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

                           शिक्रापूर (ता. शिरुर) येथील बजरंगवाडीत राहणारे प्रदीप साकोरे यांच्याकडे असलेली एम एच १२ ई एक्स ८८८० हि स्कॉर्पिओ कार त्यांचा चालक दिपक पवार याने २ जुलै रोजी साकोरे यांच्याच सिद्धिविनायक हॉस्पिटल समोरील पार्किंग मध्ये लावून चावी हॉस्पिटलमध्ये ठेवलेली होती, ३ जुलै रोजी सकाळच्या सुमारास प्रदीप हे हॉस्पिटल समोर आले असता त्यांना हॉस्पिटलच्या समोरील पार्किंग मध्ये लावलेली स्कॉर्पिओ दिसली नाही त्यामुळे त्यांनी चालकाला फोन लावत हॉस्पिटलमध्ये चौकशी केली असता चावी होती मात्र स्कॉर्पिओ गायब झाल्याचे दिसले त्यामुळे हॉस्पिटलचे सीसीटीव्ही तपासले असता २ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास एका अज्ञात युवकाने स्कॉर्पिओ चोरी केल्याचे सीसीटीव्ही मध्ये दिसून आले, याबाबत प्रदीप बाबुराव साकोरे (वय ४२ वर्षे रा. बजरंगवाडी शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार गणेश करपे हे करत आहे.