शिरुर दिनांक ( वार्ताहर )प्रा. डॉ. रमेश शंकर कळमकर लिखित  आर्यवीर प्रकाशनच्या ‘ पंचावतारम, ग्रंथाचे प्रकाशन  नुकतेच  संपन्न झाले .

    पारनेर तालुक्यातील कळमकरवाडी येथील साहित्यिक प्रा. डॉ. रमेश शंकर कळमकर लिखित ‘ पंचावतारम ’ या पुस्तकाचे प्रकाशन बिहार विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंडित पलांडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कस्तुरी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा डॉ.जयश्री पलांडे यांनी भूषविले. या प्रसंगी बोलताना डॉ. पंडित पलांडे यांनी ‘ या पुस्तकात लेखकाने विषयाची मांडणी अत्यंत सुरेख पद्धतीने केली आहे . ज्यामुळे वाचक नक्कीच स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करतील. असे अभिजात लेखन नव लेखकांकडून अपेक्षित आहे. भूतकाळाचा अनुभव, भविष्याचा वेध घेत वर्तमानातील आव्हाने पेलण्याचे सामर्थ्य केवळ वाचनामुळेच मिळते.नव्या पिढीला वाचनाचा व्यासंग कसा निर्माण करता येईल आणि चांगल्या वाचनातून नव्या पिढीच्या जगण्याला अधिकाधिक समृद्धता येईल यावर लक्ष देणे काळाची गरज आहे’ असे मत  ही पलांडे  यांनी व्यक्त केले.

      डॉ. कळमकरांच्या लेखनाने अध्यात्माला विज्ञानाची जोड देत समाजाला दिशा देण्याचे काम होईल. पुस्तकाच्या माध्यमातून विवेकाला जागृत करण्याचे कार्य नक्कीच होईल. असा विश्वास अध्यक्षपदावरून बोलताना डॉ. जयश्री पलांडे यांनी व्यक्त केला.

   आर्यवीर प्रकाशनचे  अरुण वाळुंज म्हणाले की  शिक्षण क्षेत्रातील प्रचंड व्यासंग, अध्यापनाची दीर्घ तपस्या, त्याचबरोबर विद्यार्थीप्रिय होण्याची किमया डॉ. कळमकरांनी सहजसाध्य करून दाखविली आहे. सहजसुंदर प्रभावी मांडणीतून वाचकांना आपलेसे करीत अंतर्मुख करण्याचे सामर्थ्य कळमकरांच्या लेखनीत निश्चितच आहे. समाजातील वंचित घटकांना एकत्र आणून त्यांना ज्ञानार्जन करणे ही काळाची गरज आहे. हे ओळखून बाराव्या शतकात सर्वज्ञ श्री चक्रधरस्वामीनी महानुभाव पंथाची स्थापना केली. महानुभाव साहित्य देशी भाषेत म्हणजेच मराठीतून लिहिण्याचा ‘दंडक’ केला. त्यामुळे महानुभाव पंथाचे विचार तळागाळात पोहचले. ही मराठी साहित्याला फार मोठी देण आहे.

    लेखकाला वाचकांच्या प्रोत्साहनाची गरज असते असे मनोगत लेखक डॉ. रमेश कळमकर यांनी व्यक्त केले. या प्रसंगी उद्योजक राजूशेठ घावटे, दादाभाऊ कळमकर, माजी सरपंच अरुण कळमकर, प्रा. नरसिंह पांचाळ, नरेश भगत, हरीश सातपुते, नंदकुमार पाटील आणि अंकुश सुतार यांनीही आपली मते व्यक्त केली. कार्यक्रमास लेखकाच्या माता पित्यासह, कुटुंबीय , विविध क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती. प्रा. संजय राऊत यांनी सूत्रसंचालन केले.तर प्राचार्य डॉ. जगदीश राठोड यांनी उपस्थितांचे आभार मानले.