महिलेला कुऱ्हाडीचा धाक दाखवत दागिने लांबवले

तळेगाव ढमढेरे, प्रतिनिधी:

 आरणगाव (ता. शिरुर) येथील तोंडेवस्ती येथे रात्रीच्या सुमारास दोन अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत तीन घरात चोरी करुन एका महिलेला कुऱ्हाडीचा घाव घालत महिलेच्या अंगातील दागिने चोरून नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे दोन अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

                          आरणगाव (ता. शिरूर) येथील बायडाबाई तांबे या घरात झोपलेल्या असताना रात्री दीड वाजण्याच्या सुमारास हातात कुऱ्हाड घेऊन दोन चोरटे घरात घुसले. त्यांनी घरात शोधाशोध सुरू केली असता बायडाबाई जाग्या झाल्या, यावेळी चोरट्यांनी ओरडू नको नाहीतर मारून टाकीन अशी धमकी बायडाबाई यांना दिली. तर एकाने त्याच्या हातातील कुऱ्हाडीने बायडाबाई यांच्या डोक्यात घाव घालत त्यांना जखमी करुन त्यांच्या अंगावरील एक तोळा वजनाचे दागिने काढून घेतले, त्यांनतर बायडाबाई यांनी आरडाओरडा केल्याने बाबाजी तांबे जागे झाले असता चोरटे पळून गेले, तर आलेल्या चोरट्यांनी तांबे यांच्या शेजारी राहणारे धनंजय तोंडे व चंदर भांड यांच्या देखील घरात चोरी केल्याचे समोर आले आहे. या हल्ल्यात बायडाबाई गणपत तांबे (६५ वर्षे रा. तोंडेवस्ती आरणगाव ता. शिरूर जि. पुणे) या जखमी झाल्या असून त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहे, तर घडलेल्या घटनेबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे, पोलीस उपनिरीक्षक रज्जाक शेख, पोलीस हवालदार श्रीमंत होनमाने, शंकर साळुंके, अमोल दांडगे, संतोष मारकड यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असून याबाबत बाबाजी गणपत तांबे (वय ३५ वर्षे रा. आरणगाव ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने शिक्रापूर पोलिसांनी दोन अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत पठारे हे करीत आहेत.