पालखी सोहळ्याला पहिल्याच दिवशी गालबोट; पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज
तळेगाव ढमढेरे प्रतिनिधी:
आज संत ज्ञानेश्वर पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान असल्याने टाळ-मृदुंगाच्या निनादात व ज्ञानेश्वर महाराजांच्या अखंड जयघोषात भगवी पताका हाती घेत नाचणाऱ्या वारकऱ्यांमुळे समस्त अलंकापुरी भक्तिरसात न्हाऊन निघाली असुन या पालखी सोहळ्यासाठी अवघी अलंकापुरी सजली आहे. मात्र याच पालखी सोहळ्याला पहिल्याच दिवशी गालबोट लागलं आहे.
पालखी सोहळ्यादरम्यान वारकरी आणि पोलिसांमध्ये वाद होऊन झटापट झाली. मंदिरातील प्रवेशावरुन सुरू झालेला हा वाद चिघळला व पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. आज सायंकाळी चार वाजता माउलींच्या पालखी सोहळ्याचे मुख्य मंदिरातून पंढरीकडे प्रस्थान झाले. यापार्श्वभूमीवर प्रस्थान पूर्वीची संपूर्ण तयारी पूर्ण झाल्याची माहिती देवस्थान कमिटीने दिली आहे. अशातच वारकरी अन् पोलीस आमने सामने आले असून पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला आहे. पालखीचे प्रस्थान होण्याअगोदरच हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या पालखी सोहळ्यासाठी शेकडो पोलीस तैनात करण्यात आले आहेत. वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये तसेच सुरक्षेसाठी पोलीस फाटा तैनात करण्यात आला आहे. हा वाद पोलीस आणि वारकऱ्यांमध्येच झाल्याने पोलिसांचे नियोजन चुकल्याचे बोलले जात आहे. त्यासोबतच पोलिसांनी वारकऱ्यांवर सौम्य लाठीचार्ज केल्यामुळे वारकऱ्यांकडून नाराजीचा सूर असुन आषाढीवारी सोहळ्यासाठी लाखो वारकरी आळंदीत दाखल झाले आहेत.